Latest

गावच्या तरुणांचे धाडस ! बिबट्यासह उचलून आणला पिंजरा..त्यानंतर..

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात गावच्या तरुणांनी असं धाडस दाखवलं की, वनविभागाचे अधिकारीही त्यांचं कौतुक करताना थकले नाहीत.

मंडळी, श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव येथे एका शेतातील विहिरीत बिबट्या पडला. रात्रभर प्रयत्न करूनही त्याला विहिरीतून बाहेर पडता आलं नाही. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्याने सरपंच सागर मुठे यांना माहिती दिली आणि त्यानंतर वनविभागाला पाचारण करण्यात आलं.

मात्र, त्यावेळी आणखी एक मोठी अडचण निर्माण झाली. परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. शेतात चिखल आणि पाणी साचल्यामुळे वनविभागाला बिबट्याचा पिंजरा विहिरीपर्यंत नेता येत नव्हता.

तेवढ्यात गावातील तरुण पुढे सरसावले. अवघ्या काही मिनिटांत ५० हून अधिक तरुण घटनास्थळी जमा झाले. त्यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट पिंजरा खांद्यावर उचलला आणि चिखलातून वाट काढत तो विहिरीपर्यंत नेला.

यानंतर पिंजरा विहिरीत सोडण्यात आला आणि काही वेळानंतर बिबट्या त्यामध्ये सुरक्षितपणे अडकला. पण काम अजून संपले नव्हते. आता हा पिंजरा पुन्हा चिखलातून उचलून वनविभागाच्या वाहनापर्यंत नेण्याचं मोठं आव्हान होतं.

पुन्हा एकदा गावातील तरुण पुढे आले. त्यांनी बिबट्यासह पिंजरा उचलला आणि सुरक्षितपणे वनविभागाच्या वाहनात ठेवला.
मंडळी, गावातील तरुणांचं हे धाडस पाहून वनविभागाचे कर्मचारीही अवाक झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button