
अहिल्यानगरमध्ये एक वेगळा ट्रेंड दिसायला लागलाय. गहू आणि कांद्याऐवजी शेतकरी आता उन्हाळी बाजरीकडे वळत आहेत आणि त्यातून लाखोंचं उत्पन्न मिळवण्याची तयारी सुरू आहे. मंडळी, पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे वैभव आणि पोपटराव आंधळे या पिता-पुत्रांनी यंदा २२ एकरांवर उन्हाळी बाजरीची लागवड केली आहे.
आतापर्यंत शेतकरी उसाचा खोडवा काढल्यानंतर गहू किंवा कांदा ही पारंपरिक पिके घेत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. कांद्याचा खर्च एकरी ८० हजारांपर्यंत गेला आहे आणि दर घसरल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. गव्हालाही बाजारात कमी दर मिळत आहे. याच्या तुलनेत बाजरीला सध्या सुमारे २,८०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
हार्वेस्टरमुळे मजुरांची अडचणही कमी झाली आहे. या पितापुत्रांना या पिकासाठी एकरी साधारण १२ ते १३ हजार खर्च येतो. आणि जर १८ ते २० क्विंटल उत्पादन मिळालं, तर एकरी सुमारे ४५ हजार रुपयांचं उत्पन्न मिळू शकतं. म्हणजेच २२ एकरातून तब्बल ११ लाख रुपयांचं उत्पन्न मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंडळी, बदलत्या परिस्थितीत पीक पद्धती बदलणं किती महत्वाचं आहे, याचं हे उत्तम उदाहरण आहे.





