Latest

बाजरीने बदलले शेतकऱ्याचे नशीब ! २२ एकरांतून तब्बल ११ लाखांचे उत्पन्न…

“कांदा-गव्हापेक्षा बाजरीत जास्त फायदा?” पाथर्डीतील शेतकऱ्यांचा हा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे! अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा पाटचारी लाभक्षेत्रात आता अनेक शेतकरी पारंपरिक नगदी पिकांना फाटा देत उन्हाळी बाजरीकडे वळत आहेत.

कारण वाढता खर्च आणि घटणारे उत्पादन यामुळे कांदा आणि गहू परवडेनासे झाले आहेत. जवखेडे खालसा येथील वैभव आणि पोपटराव आंधळे या पिता-पुत्रांनी तब्बल २२ एकरांवर उन्हाळी बाजरीची लागवड केली आहे.

विशेष म्हणजे त्यांनी चार वेगवेगळ्या वाणांची पेरणी आठ दिवसांच्या अंतराने केली. त्यामुळे काढणी टप्प्याटप्प्याने होणार असून उत्पादन वाढण्याचीही शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मते, कांद्याचा खर्च आता एकरी ८० हजारांपर्यंत जातो, पण बाजारभाव मात्र घसरत आहेत.

गव्हालाही अपेक्षित दर मिळत नाही. तर बाजरीला सध्या सुमारे २,८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. या पिकासाठी एकरी फक्त १२ ते १३ हजार खर्च येत असून, १८ ते २० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे.

म्हणजेच एकरी सुमारे ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. २२ एकरांतून तब्बल ११ लाखांचे उत्पन्न मिळण्याची आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button