
शिर्डीत शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीनंतर मोठा गोंधळ! महिला पदाधिकाऱ्याला दमबाजी झाल्याचा आरोप… आणि थेट रुग्णालयात दाखल करण्याची आली वेळ!
शिर्डी येथे शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मोठा वाद उफाळून आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात राहाता आणि कोपरगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
बैठक संपल्यानंतर कोपरगावमधील दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या वादादरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख मीनाक्षीताई वाकचौरे यांना दमबाजी करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे बैठकीत एकच गोंधळ उडाला. वाद वाढू नये म्हणून काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.
दरम्यान, तणावामुळे मीनाक्षीताई वाकचौरे यांचा अचानक ब्लड प्रेशर वाढला आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर रात्री उशिरा त्यांना घरी सोडण्यात आले.





