
राजकीय संघर्ष बाजूला ठेवत सुजय विखेंनी वाकून नमस्कार केला, तर थोरातांनी पाठीवर थाप देत दिला आपुलकीचा प्रतिसाद ! आणि नेमका हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.
मंडळी, जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माजी खासदार सुजय विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे पाया पडले.
राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी असतानाही सुजय विखेंनी दाखवलेला हा आदर उपस्थितांचे लक्ष वेधून गेला. तेव्हापासून सुजय विखेंच्या राजकीय शैलीची, संस्काराची चर्चा होत आहे.
यावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, पाया पडण्याचा फार बाऊ करू नये. सुजय आमच्या मुलासारखाच, आम्ही एकमेकांचा आदर आणि मान राखण्याचं पथ्य कायम पाळतो. कदाचित राधाकृष्ण विखेंवर बोलेन, पण सुजयवर नाही, असंही त्यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे, सुजय विखे यांच्या कृतीचं थोरातांनीही आपुलकीने स्वागत केलं. राजकीय मतभेद वेगळे आणि ज्येष्ठांचा आदर वेगळा, हा संस्कार सुजय विखेंच्या कृतीतून पुन्हा एकदा पाहायला मिळाला.





