
मंडळी, केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी सिया गोयल हिला केतनचे टक्कल आणि तो वापरत असलेला विग पसंत नव्हता.
याच कारणामुळे नात्यात दुरावा निर्माण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपासात असेही समोर आले आहे की, केतनला ट्रेकिंगची आवड असल्याने त्याचाच फायदा घेत लोहगड किल्ल्याची निवड करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सिया आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी या ठिकाणाची अनेकदा पाहणी केली होती. १४ जूनला झालेला कथित पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर १८ जून रोजी पुन्हा किल्ल्यावर गेल्यानंतर संधी साधून केतनला दरीत ढकलल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.
सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते. मात्र तांत्रिक पुरावे, संवाद आणि घटनास्थळावरील माहितीच्या आधारे पोलिसांनी हा पूर्वनियोजित कट असू शकतो, असा संशय व्यक्त केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून येत्या काही दिवसात सर्व सत्य आपल्यासमोर येणार आहे.





