
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या कोट्यवधी यूजर्ससाठी मोठी बातमी आहे. आता व्हॉट्सअॅपवर चॅट करण्यासाठी प्रत्येक वेळी मोबाईल नंबर शेअर करण्याची गरज राहणार नाही. कारण व्हॉट्सअॅपमध्ये आता ‘यूजरनेम’ हे नवं फीचर येत आहे.
मंडळी, आतापर्यंत एखाद्या नवीन व्यक्तीशी व्हॉट्सअॅपवर बोलायचं असेल, तर मोबाईल नंबर देणं आवश्यक होतं. पण आता तुम्ही निवडलेल्या ‘यूजरनेम’च्या माध्यमातूनही संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे तुमचा मोबाईल नंबर समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही आणि गोपनीयतेलाही अधिक संरक्षण मिळणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, व्हॉट्सअॅप कोणतीही सार्वजनिक ‘यूजरनेम’ यादी तयार करणार नाही. तसेच एखाद्याचे नाव टाइप केले की यूजरनेम आपोआप दिसेल, अशी सुविधाही असणार नाही. त्यामुळे ज्याच्याशी संपर्क साधायचा आहे, त्याचा अचूक यूजरनेम माहिती असणं आवश्यक असेल.
हे फीचर भारतात टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहे. २९ जूनपासून अनेक यूजर्सना अॅपमध्ये यासंदर्भातील नोटिफिकेशन मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये यूजरनेम रिझर्व्ह करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एकंदरीत, व्हॉट्सअॅपचा हा बदल यूजर्सच्या गोपनीयतेच्या दृष्टीने मोठा आणि महत्त्वाचा मानला जात आहे. आता मोबाईल नंबर न देता केवळ यूजरनेमद्वारेही संवाद साधणे शक्य होणार आहे. तुमच्या व्हाटसपला हे फिचर अपडेट झालय का? कमेंटमध्ये सांगा..





