
अहिल्यानगर जिल्हा बुधवारी रात्री एका धक्कादायक घटनेने हादरला. संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावचे माजी सरपंच आणि भाजपचे पदाधिकारी संदीप घुगे यांच्या घरावर थेट गोळीबार करण्यात आला. इतकंच नाही, तर तलवारीने घराची तोडफोडही करण्यात आली. सुदैवाने या हल्ल्यात संदीप घुगे बालंबाल बचावले.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हल्ल्याच्या काही वेळ आधी व्हॉट्सअॅप ग्रुपवर संदीप घुगे यांना श्रद्धांजली वाहणारा संदेश टाकण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री दहाच्या सुमारास दोन मोटारसायकलींवरून सहा जण संदीप घुगे यांच्या घरी आले. मुरुम वाहतुकीच्या वादातून त्यांनी घराबाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी पिस्तुलातून घुगे यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यानंतर तलवारीने घराचे दरवाजे आणि खिडक्यांची तोडफोड करण्यात आली. हल्ल्यादरम्यान आरोपींनी घुगे यांना जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संदीप घुगे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळी, या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आलाय.





