Latest

खळबळजनक ! बलात्कारातील आरोपी पोलिस ठाण्यातून पळाला, अहिल्यानगरमधील घटना..

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बलात्कार प्रकरणातील एका संशयित आरोपीने थेट पोलिस ठाण्यातून पलायन केल्याची घटना घडली असून, त्याला एका पोलिस कर्मचाऱ्यानेच मदत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

मंडळी, मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कार प्रकरणातील संशयित गणेश बाळासाहेब म्हस्के याला गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेसाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याला एका खोलीत बसवण्यात आले होते. याच दरम्यान एक पोलिस कर्मचारी वारंवार त्या खोलीत ये-जा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

सुरुवातीला त्या ठिकाणी होमगार्ड तैनात होता. मात्र, काही वेळासाठी होमगार्ड तेथून गेल्यानंतर संशयित आरोपी तेथून पळून गेल्याची चर्चा आहे. या संपूर्ण घटनेचे चित्रण पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये झाल्याचा दावा पीडितेच्या नातेवाइकांनी केला आहे. त्यामुळे हे सीसीटीव्ही फुटेज तपासून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी संबंधित कर्मचाऱ्याला आरोपीला तातडीने हजर करण्याचे आदेश दिल्याचे समजते.

या सर्व प्रकरणामुळे पाथर्डीत एकच खळबळ उडाली असून, या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button