
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोटदुखीची तक्रार घेऊन आलेल्या अल्पवयीन मुलीने थेट बाथरूममध्ये बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील कोतूळ येथील एका खासगी रुग्णालयात अल्पवयीन मुलगी नातेवाईकांसोबत उपचारासाठी आली होती. पोट दुखत असल्याचे सांगत तिने बाथरूमची विचारणा केली आणि काही वेळासाठी आत गेली.
मात्र, काही मिनिटांनंतर बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने डॉक्टरांनी धाव घेतली. तपासणीदरम्यान मुलीने बाथरूममध्येच बाळाला जन्म दिल्याचे उघड झाले. डॉक्टरांनी आई आणि नवजात बाळावर तातडीने उपचार सुरू केले.
पुढील चौकशीत मुलगी अल्पवयीन असल्याचे समोर आले. बाळाच्या वडिलांबाबत विचारणा केल्यानंतर मुलीने अमोल सुभाष चौधरी याचे नाव सांगितले. त्यानंतर डॉ. शिवराज सुभाष देशमुख यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलिसांनी अमोल चौधरीविरोधात पोक्सोसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.





