
कल्पना करा… तुम्ही उपचारासाठी डॉक्टरांकडे जाता आणि नंतर समजते की तुमची तपासणी करणारी व्यक्ती डॉक्टरच नव्हती !
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विश्वास खैरनार याच्यावर कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार केल्याचा आरोप असून, त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, वॉर्ड क्रमांक ३ मधील गजानन क्लिनिक येथे विश्वास खैरनार हा त्याची सून डॉ. सुवर्णा खैरनार यांच्या नावाचा वापर करत होता. त्यांच्या खुर्चीवर बसून रुग्णांची तपासणी करणे, तसेच त्यांच्या लेटरपॅडवर औषधे लिहून देणे, असा आरोप तपासात समोर आला आहे.
या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वैरागर यांनी फिर्याद दिली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस आणि आरोग्य विभाग पुढील तपास करत आहेत.





