
अहिल्यानगरकरांनो, तुम्ही जे पाणी पिता आहात, ते खरंच पिण्यायोग्य आहे का? कारण आता नगर शहरातून समोर आलेली माहिती अक्षरशः धक्कादायक आहे. गंज बाजार आणि सराफ बाजार परिसरात नागरिकांच्या नळाला मातीमिश्रीत, दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी येत असून, काही घरांमध्ये पाण्यात सूक्ष्म किटक आणि अळ्यासदृश्य जीवही आढळल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.
एका बाजूला महापालिका कर वसुलीत तत्परता दाखवते पण दुसऱ्या बाजूला नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी देण्यात मात्र अपयशी ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या दूषित पाण्यामुळे डायरिया, टायफॉइड, कॉलरा आणि कावीळसारखे गंभीर जलजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, जलवाहिनीत कुठेतरी सांडपाणी मिसळत असावं किंवा पाणी गाळण्याची प्रक्रिया योग्य पद्धतीने होत नसावी. त्यामुळेच हा प्रकार घडत असल्याची चर्चा आता शहरभर सुरू झाली आहे.
“आम्ही दूषित पाणी पिऊन मरण्याची वाट प्रशासन पाहतंय का?” असा संतप्त सवाल आता व्यापारी आणि रहिवासी विचारत आहेत. आता पाहायचं एवढंच की, महापालिका प्रशासन याकडे किती गंभीरतेने पाहतं आणि नगरकरांना स्वच्छ पाणी कधी मिळतं? खरंय ना? कमेंटमध्ये व्यक्त व्हा..





