
अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुळा साखर कारखान्याजवळील उसाच्या शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका पुरुषाचा केवळ हाडांचा सांगाडा आढळून आला. मात्र, हा सांगाडा नेमका कोणाचा, याचा शोध घेतल्यानंतर मृताची ओळख पटली आहे.
विजय सर्जेराव गायकवाड, वय ४४, असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाडळी गावचे रहिवासी होते. विशेष म्हणजे, विजय गायकवाड हे मागील चार महिन्यांपासून घरातून बेपत्ता होते.
मुळा कारखाना परिसरातील शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचा प्राथमिक तपशील समोर आला आहे. मात्र, शेतात आतपर्यंत हा प्रकार घडल्याने कोणाच्याही लक्षात आला नाही. सध्या उसाची तोडणी सुरू असताना शुक्रवारी, १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
माहिती मिळताच सोनई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.





