
खिशात फक्त ५०० रुपये… आणि डोळ्यांत मोठी स्वप्नं ! आज हाच तरुण जगातील आघाडीच्या कंपनीत उच्च पदावर काम करत आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले अजित सोमनाथ ताजणे यांनी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या बळावर जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज ते डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे जगातील अग्रगण्य जैवतंत्रज्ञान कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
आर्थिक अडचणींमुळे अनेकदा शिक्षण थांबण्याची वेळ आली, पण त्यांनी हार मानली नाही. जळगाव येथून अभियांत्रिकी शिक्षणात सुवर्णपदक मिळवल्यानंतर त्यांनी मुंबईत करिअरची सुरुवात केली आणि त्यानंतर मेहनतीच्या जोरावर जगातील २५ हून अधिक देशांचा व्यावसायिक प्रवास केला.
अजित ताजणे यांचे यश हे केवळ वैयक्तिक यश नाही, तर ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणा आहे. मोठी स्वप्नं पाहा, शिक्षणाला ताकद बनवा आणि परिस्थितीला कधीच तुमच्या यशाच्या आड येऊ देऊ नका.





