
८ ऑक्टोबरची रात्र… वेळ साधारण साडेअकराची! गोदावरी नदीपात्रातून राखीव वनक्षेत्रात होणाऱ्या कथित अवैध वाळू वाहतुकीची चौकशी करण्यासाठी वन विभागाचे पथक कोळगावथडीतील वनक्षेत्र गट क्रमांक २४३ मध्ये पोहोचले. यावेळी वाळू वाहतुकीच्या प्रकरणात स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर पकडण्यात आला. मात्र, त्यानंतर घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
मध्यरात्री एकच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांचा रस्ता अडवण्यात आला. लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि कोयत्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे.
एवढंच नाही, तर शासकीय वाहनाची तोडफोड करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर पकडलेला ट्रॅक्टर आणि त्यातील शासनाची एक ब्रास वाळू जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला.
वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांच्या फिर्यादीवरून १४ नामनिर्दिष्ट आरोपींसह ३५ ते ४० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड आणि सहाय्यक निरीक्षक धरमसिंग सुंदरडे तपास करत आहेत. आता या प्रकरणात पुढे काय उघड होणार, याकडे लक्ष लागले आहे.





