
नवरात्रीसाठी देवीची ज्योत आणण्यासाठी अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यातील एकरुखे गावातील ७८ तरुण थेट श्रीलंकेला रवाना झाले आहेत. गेल्या २२ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही अखंडपणे सुरू राहणार आहे.
देवेंद्र भवर आणि गणेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे तरुण श्रीलंकेतील इंद्राक्षी माता मंदिरातून वज्रेश्वरी देवीसाठी पवित्र ज्योत आणणार आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी या तरुणांनी १६ वेगवेगळ्या शक्तिपीठांतून ज्योत आणली आहे.
या प्रवासात सर्वात मोठं आव्हान म्हणजे ज्योत सुरक्षितपणे भारतात आणणं. बोटीमध्ये ज्वलनशील पदार्थांना परवानगी नसल्याने डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून केंद्र आणि राज्य गृह खात्याची विशेष परवानगी मिळाली आहे.
ज्योत घेऊन परतल्यानंतर हे तरुण तब्बल १६०० किलोमीटरचा प्रवास अनवाणी पायांनी करणार आहेत. दररोज जवळपास १५० किलोमीटर अंतर पार करत नवरात्रीच्या अष्टमीला ते गावी पोहोचणार आहेत.
२२ वर्षांची परंपरा, ७८ तरुणांची एकजूट आणि देवीप्रती असलेली श्रद्धा… एकरुखेच्या या अनोख्या यात्रेची सर्वत्र चर्चा रंगली आहे!





