Latest

भंडारदरासह मुळा पाणलोटातही पाऊसाचा जोर वाढला; किती टक्के झाले धरणांत पाणी ?

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.. भंडारदरा आणि मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणसाठ्यातही चांगली वाढ होत आहे.

मंडळी, गेल्या तीन दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात मान्सून सक्रिय झाला आहे. शुक्रवारी सुरू झालेला पाऊस शनिवारी आणखी वाढला असून धरणाकडे येणाऱ्या पाण्याची आवकही वाढत आहे. त्यामुळे भंडारदरा धरण आज-उद्या 65 टक्के भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या 11 हजार 39 दलघफूट क्षमतेच्या भंडारदरा धरणात 6 हजार 921 दलघफूट म्हणजेच 62.69 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर निळवंडे धरणात 2 हजार 935 दलघफूट म्हणजे 35.22 टक्के साठा उपलब्ध आहे.

आढळा धरणही आता ओव्हरफ्लोच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. हरिश्चंद्रगड, पाचनई, आंबित आणि परिसरात चांगला पाऊस झाल्याने मुळा धरणातील पाणीसाठाही वाढत आहे.

26 हजार दलघफूट क्षमतेच्या मुळा धरणात सध्या 10 हजार 587 दलघफूट म्हणजेच 40.71 टक्के पाणीसाठा झाला आहे.एकूणच, जिल्ह्यातील धरणांमध्ये वाढणारा पाणीसाठा हा शेती, पिण्याचे पाणी आणि आगामी काळासाठी दिलासादायक मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button