Latest

हलाखीची स्थिती, आईवडिलांची मोलमजुरी.. तिघी सक्ख्या बहिणी पोलीस दलात भरती !

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातून एक प्रेरणादायी बातमी समोर आलीये. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या एका कुटुंबातील तिन्ही सक्ख्या बहिणींनी मोठं यश मिळवलंय. या तिन्ही बहिणी आज महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत.

मंडळी, जामखेड तालुक्यातील तेलंगशी या छोट्याशा गावातील क्षीरसागर कुटुंबाने संघर्ष, जिद्द आणि शिक्षणाच्या बळावर हा आदर्श निर्माण केलाय.

देवीदास क्षीरसागर आणि त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी शेतमजुरी करून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. संसार चालवण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. उन्हाळ्यात सायकलवर गावोगाव कुल्फी, आईस्क्रीम आणि बर्फगोळे विकले. दिवाळीत झाडणी बांधणे, चिंचा गोळा करणे अशी अनेक कामे करत त्यांनी मुलींना शिकवलं.

गावात सातवीपर्यंतच शाळा असल्याने पुढील शिक्षणासाठी अनेक अडचणी आल्या. पण परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी मुलींना शिक्षण दिलं आणि त्याच शिक्षणाच्या जोरावर आज तिन्ही मुली पोलीस दलात दाखल झाल्या आहेत.

मोठी मुलगी रेखा अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत आहे. दुसरी मुलगी शीतल पिंपरी-चिंचवड पोलीस दलात काम करते, तर तिसरी मुलगी संगीता मीरा-भाईंदर पोलीस दलात सेवा बजावत आहे.

आजही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुलींचे शिक्षण अर्धवट सोडले जाते. पण क्षीरसागर कुटुंबाने समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. संघर्षातून उभ्या राहिलेल्या या तिन्ही लेकींसाठी एक लाईक तर बनतोच..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button