
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय नेते सहकाराच्या व्यासपीठावर एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी एकत्र येण्यामागील भूमिका स्पष्ट केली आहे.
एकमेकांमधील संघर्ष थांबतोय, कटुता संपत आहे आणि आम्ही एकत्र येत आहोत, याचा आनंद कार्यकर्त्यांना व्हायला हवा, असे थोरात यांनी म्हटले आहे. राजकारण आणि सहकार हे दोन वेगवेगळे विषय आहेत. राजकारणात तात्त्विक मतभेद असावेत, मात्र ते व्यक्तिद्वेषाचे असू नयेत, अशी आमची नेहमीच भूमिका राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणातील मतभेद आणि सहकारातील एकत्रित काम यांची गल्लत करू नये, असे सांगताना थोरात यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने घसरत चालली आहे, ते पाहता आपल्या जिल्ह्याने अहिल्यानगर राज्याला वेगळी दिशा दाखवावी, असे त्यांनी म्हटले.
राज्यातील राजकारणापेक्षा सहकार क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण करण्याची गरज आहे. त्याच उद्देशाने जिल्ह्यात सहमतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रयत्नातून जिल्ह्यात चांगले घडवण्याचा हेतू असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
दरम्यान, आज मतदान प्रक्रिया पार पडल्याने आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार क्षेत्रात निर्माण झालेली नवी समीकरणे आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर कसा परिणाम करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





