Latest

लोणच्याची घाई ! कैरीचा भाव १०० रुपयांवर,फोडायला १५ रुपयांचा भाव..

उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांना वेध लागतात ते आंब्यांचे, पण त्यानंतर खरी लगबग सुरू होते ती लोणच्याची. मंडळी, बाजारात आता खास लोणच्यासाठी लागणाऱ्या गावरान कैऱ्यांची आवक सुरू झाली आहे.

घरच्या चवीचं लोणचं करण्यासाठी अनेक महिला बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. रेडिमेड लोणच्यापेक्षा घरगुती लोणच्यालाच अजूनही जास्त पसंती दिली जात आहे.

यंदा मात्र कैरीचे दर चांगलेच वाढले आहेत. गावरान आणि राजापुरी कैरी सध्या ८० ते १०० रुपये किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे लोणच्याची घाई सुरू असली तरी गृहिणींच्या खिशालाही चांगलीच झळ बसत आहे.

दरम्यान, कैरी विक्रेत्यांसोबत आता कैरी फोडणारे व्यावसायिकही सज्ज झाले आहेत. अवघ्या १० ते १५ रुपये किलो दराने कैरी कापून दिली जात असल्याने अनेक महिलांची मेहनत वाचत आहे.

लोणच्यासाठी आंबट, कडक आणि ताजी कैरी सर्वात महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे गावरान कैऱ्यांना सध्या मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह आष्टी तालुक्यातूनही नगर शहरात मोठ्या प्रमाणात कैऱ्यांची आवक होत आहे.

मंडळी, उन्हाळा आणि घरगुती लोणचं यांचं नातं अगदी खास आहे. पण यंदा लोणच्याचा स्वाद घेताना खिशाचाही विचार करावा लागणार, एवढं मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button