
लोक पेट्रोल भरायला जातात आणि पंपावर ‘NO STOCK’ चा बोर्ड पाहून परत माघारी फिरतात. सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात ही परिस्थिती बऱ्याच ठिकाणी दिसते. म्हणून पेट्रोल टंचाईची भीती वाढताना दिसत आहे.
जिल्ह्यातील तब्बल २०० हून अधिक पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याने ‘नो स्टॉक’चे फलक लावण्याची वेळ आली आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनटंचाई होईल या अफवेमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात वाहनांच्या टाक्या फुल करून घेत आहेत.
साधारणपणे एका पंपावरचा ८ हजार लिटरचा साठा तीन दिवस पुरतो. मात्र आता तो अवघ्या सहा ते आठ तासांत संपत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक पंप बंद ठेवावे लागत आहेत. शिर्डीतील चारही पेट्रोल पंप रविवारी पूर्णपणे बंद होते.
जिल्ह्यात सुमारे ४५० पेट्रोल पंप आहेत. पूर्वी ३० ते ३५ लाख लिटर इंधन पुरवठा होत होता, मात्र सध्या फक्त १८ ते २० लाख लिटर साठाच मिळत आहे.
पेट्रोल डीलर असोसिएशनने नागरिकांना आवाहन केले आहे की, घाबरून जास्त इंधन साठवू नका. गरजेपुरतेच पेट्रोल भरावे, अन्यथा कृत्रिम टंचाई आणखी वाढू शकते.





