तुमच्या खिशातील कागदी नोटा लवकरच प्लास्टिकच्या होणार का? यावर मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पॉलिमर म्हणजेच प्लास्टिक नोटांच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. RBI ची नोटा छापणारी कंपनी अत्याधुनिक सुरक्षा असलेल्या पॉलिमर शीटसाठी जागतिक कंपन्यांकडून निविदा मागवत आहे. मात्र, याचा अर्थ प्लास्टिक नोटा लगेच चलनात येणार आहेत, असा नाही.
सुरुवातीला मर्यादित प्रमाणात पॉलिमर शीटवर नोटा छापून त्यांची चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्यास पुढील निर्णय घेतला जाईल. या प्रक्रियेसाठी राष्ट्रीय सुरक्षेचे कडक निकष ठेवण्यात आले असून, चीन किंवा पाकिस्तानमधील कोणतेही साहित्य वापरण्यास परवानगी नसणार आहे.
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर आणि ६० हून अधिक देशांमध्ये पॉलिमर नोटांचा वापर आधीच सुरू आहे. भारतातही हा बदल झाला, तर नोटा अधिक टिकाऊ, स्वच्छ आणि बनावट नोटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मात्र, अंतिम निर्णय RBI चाचणी पूर्ण झाल्यानंतरच घेणार आहे.





