
अहिल्यानगरमध्ये आता अमली पदार्थांविरोधात मोठी आणि कडक कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आता ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ सापडतील, त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई होऊ शकते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थ सापडतील, त्या ठिकाणच्या पोलीस निरीक्षकाला निलंबित केले जाईल, आणि गरज पडल्यास बडतर्फही केले जाईल, अशी भूमिका घेतली आहे. हाच निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातही लागू केला जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
सहकार सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी सावेडी परिसरातील एका २१ वर्षीय तरुणाने अमली पदार्थांच्या आहारी गेल्याने आत्महत्या केली होती. याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, एका तरुणाने अमली पदार्थांच्या विळख्यात अडकून आपले जीवन संपवणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.
अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक बोलावण्यात आली असून अमली पदार्थ तस्करांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले जाणार आहेत. मंडळी, कसा वाटला हा निर्णय? कमेंट मध्ये नक्की सांगा..





