
देशभर गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट अहिल्यानगरपर्यंत पोहोचलेत. या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केलीये. मंडळी, राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडे या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक करण्यात आली.
नीट पेपरफुटीच्या साखळीतील तो एक महत्त्वाचा दुवा असू शकतो, अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केलीये. या प्रकरणात आधी नाशिकमधील शुभम खैरनार या आरोपीला अटक झाली होती. त्याच्या चौकशीतूनच धनंजय लोखंडे याचे नाव समोर आले. त्यानंतर सीबीआयच्या निर्देशानुसार अहिल्यानगर पोलिसांनी शोधमोहीम राबवली.
लोखंडे हा राहुरी तालुक्यातील टाकळीमिया गावचा असून तो पुण्यातील वाघोली परिसरात राहत होता. पोलिसांनी त्याच्या घरी आणि परिसरात शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. अखेर एका ढाब्यावर तो आपल्या दोन मित्रांसह आढळून आला आणि त्याला ताब्यात घेण्यात आले.
यानंतर सीबीआयचे पथक तातडीने अहिल्यानगरमध्ये दाखल झाले. सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत म्हणजे तब्बल सहा ते सात तास आरोपीची चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने प्रश्नपत्रिका कुठून मिळवल्या, कोणाला दिल्या, आणि त्याबदल्यात किती पैसे घेतले, याचा तपास करण्यात आला. त्यामुळे या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणात तो एक मोठा दुवा ठरू शकतो असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे.





