
कर्जत नगरपंचायतीतील सत्तासंघर्षाला आता मोठं न्यायालयीन वळण मिळालंय. नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे. मंडळी, बुधवारी अविश्वास ठरावावर निर्णय होणार होता. त्यासाठी प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्तही ठेवला होता.
मात्र, मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर ही विशेष सभा रद्द करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने ११ जूनपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती कायम ठेवण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या तरी नगराध्यक्ष रोहिणी घुले यांच्या खुर्चीला दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणाची सुरुवात ७ मे रोजी झाली, जेव्हा नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला. त्याचवेळी गटनेता बदलावरूनही मोठा वाद निर्माण झाला. संतोष मेहेत्रे यांच्या जागी सतीश पाटील यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आली.
या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्यात आली. तसेच अविश्वास ठरावासाठी बोलावलेली सभा बेकायदेशीर असल्याचा दावा करत नगराध्यक्षांनीही न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर न्यायालयाने हस्तक्षेप करत सध्याची परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. मंडळी, कर्जतच्या या सत्तासंघर्षात पुढे आणखी मोठे राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.





