Latest

मान्सूनने घेतली तात्पुरती विश्रांती; पण ‘या’ तारखेपासून जोरदार सुरु होणार

पावसाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून जोरदार बरसणाऱ्या मान्सूनने सध्या तात्पुरती विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला असून ऊनही पडू लागले आहे.

मात्र ही विश्रांती फार काळ टिकणार नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या प्रभावाखाली असला तरी अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतीही मोठी हवामान प्रणाली किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले नाही. त्यामुळे २६ आणि २७ जूनदरम्यान पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मात्र २८ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर १ जुलैपासून राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या पावसात तात्पुरती घट होईल. मात्र १ ते ५ जुलै या कालावधीत विशेषतः मुंबई आणि आसपासच्या भागात पुन्हा मुसळधार पावसाचे पुनरागमन होऊ शकते.

या काळात ३५० ते ४५० मिलिमीटरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या काही दिवसांच्या उघडीपामुळे मान्सून संपल्याचा समज करून घेऊ नये. कारण जुलैच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button