
पेपरफुटी करणाऱ्यांची आता सुटका नाही ? लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर केंद्र सरकार मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थी आणि विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे पेपरफुटीच्या गुन्ह्यांवर जलद सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी आवश्यक कायदेशीर बदलांचे विधेयक संसदेत लवकर मांडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मोदी यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून अल्पावधीत पुन्हा परीक्षा घेण्यात आली आणि लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा यशस्वीपणे पार पडली.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आता या प्रस्तावित कायद्याकडे आणि त्याच्या अंमलबजावणीकडे देशभराचे लक्ष लागले आहे.





