
संध्याकाळी ७ वाजताच गावात भोंगा वाजतो… आणि मुलं लगेच मोबाइल-टीव्ही बंद करून अभ्यासाला बसतात. सध्या अहिल्यानगरमधील एका छोट्याशा गावाच्या भन्नाट उपक्रमाची राज्यभर चर्चा सुरु आहे. डिजिटल युगात लहान मुलांचे मोबाइल आणि टीव्हीचे वाढते व्यसन ही पालकांसाठी मोठी चिंता बनली आहे.
मात्र संगमनेर तालुक्यातील खांडगाव ग्रामपंचायतीने यावर एक भन्नाट उपाय शोधला आहे. ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या “अभ्यासाचा भोंगा” या उपक्रमामुळे संपूर्ण गावात शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज संध्याकाळी नेमके ७ वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर बसवलेला भोंगा वाजवला जातो.
हा आवाज ऐकताच गावातील विद्यार्थी खेळ थांबवून घरी परततात. यानंतर घरातील मोबाइल आणि टीव्ही बंद केले जातात आणि मुलं नियमित अभ्यासाला बसतात.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेळेचे नियोजन, शिस्त आणि अभ्यासाची आवड वाढत असल्याचे पालक सांगत आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, संपूर्ण तालुक्यात असा प्रयोग करणारे खांडगाव हे पहिले गाव ठरले आहे.





