
प्रत्येक ताप साधा नसतो ! पावसाळ्यात ही ३ लक्षणं दुर्लक्षित केली, तर जीवावरही बेतू शकतं. पावसाळा सुरू झाला की डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढतो.
मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाची सुरुवातीची लक्षणे सारखी वाटत असली, तरी हे तिन्ही आजार वेगवेगळे आहेत. मलेरियामध्ये थंडी वाजून वारंवार ताप येतो आणि नंतर घाम येतो.
डेंग्यूमध्ये अचानक तीव्र ताप, डोळ्यांच्या मागे वेदना, अंगदुखी, पुरळ आणि काही रुग्णांमध्ये रक्तस्रावही होऊ शकतो. तर चिकनगुनियामध्ये तापासोबत सांध्यांची असह्य वेदना हे सर्वात मोठे लक्षण असते आणि ती अनेक आठवडे टिकू शकते.
त्यामुळे स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. घराभोवती पाणी साचू देऊ नका, डासांपासून संरक्षण करा आणि ताप दोन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास तातडीने रक्त तपासणी करून योग्य उपचार सुरू करा.
वेळेवर निदान आणि काळजी घेतली, तर गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.





