
शिर्डीत आता गुन्हेगारांसाठी कोणतीही सूट नाही ! महिलेच्या निर्घृण चाकू हत्येनंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहरातील गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या साखळीचा पूर्णपणे बिमोड करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
पोलिसांना तातडीने कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश देण्यात आले असून संशयितांची कसून तपासणी केली जाणार आहे. यासोबतच नगरपरिषदही अॅक्शन मोडमध्ये आली आहे.
बेकायदेशीर बांधकामांवर जेसीबी चालवण्याची तयारी सुरू असून, भाडेकरूंची माहिती लपवणाऱ्या घरमालकांवरही कडक कारवाई होणार आहे. अशा घरांचे पाणी कनेक्शन आणि स्ट्रीट लाइटसारख्या नागरी सुविधा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहरात शस्त्रसाठा असल्याच्या शक्यतेमुळे घरांची झडतीही घेतली जाणार आहे. शिर्डीत कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, गुन्हेगारांवर निर्णायक कारवाईची तयारी पूर्ण झाली आहे.





