
२०१६ मध्ये श्रीरामपूरमध्ये गाजलेल्या फ्रूट मार्केट जाळपोळ आणि दंगल प्रकरणात अखेर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ८ मे २०१६ रोजी रिक्षाचालक धुलखंड आणि एका तरुणामधील किरकोळ वादानंतर तणाव निर्माण झाला. त्यावेळी तत्कालीन भाजप पदाधिकारी मारुती बिंगले यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वाद चिघळत गेला आणि संतप्त जमावाने फ्रूट मार्केटला आग लावल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी प्रकाश चित्ते, विजय जयस्वाल, संजय यादव, मारुती बिंगले, गणेश परदेशी, सचिन यादव, जिशान शेख, शोएब कुरेशी, वसीम शेख, सिद्धार्थ सोनवणे यांच्यासह जवळपास ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एन. साळवे यांच्यासमोर झाली. मात्र आरोपींविरुद्ध ठोस पुरावे सिद्ध न झाल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या बाजूने ॲड. ए. पी. परदेशी, ॲड. एजाज पठाण, ॲड. पंकज म्हस्के, ॲड. आरीफ शेख आणि ॲड. मयुर गांधी यांनी बाजू मांडली.





