
यंदा पाऊस कमी पडणार, पण तरीही ऊस, कापूस आणि तुरीचे उत्पादन जोरदार येणार असा महत्त्वाचा अंदाज हवामानतज्ज्ञ डॉ. पंजाबराव डक यांनी अहिल्यानगरमधून व्यक्त केलाय. त्यांच्या अंदाजानुसार, यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी असला तरी पिकांचं उत्पादन चांगलं होणार आहे.
ते म्हणाले की, गावरान आंब्याला यंदा मोठ्या प्रमाणात फुलोरा आला आहे , निसर्गाच्या या संकेतांनुसार पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता असते. तरीही योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे ऊस, कापूस आणि तूर ही पिके यंदा चांगली येणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
कापसासाठी २९ मे हा पेरणीसाठी योग्य दिवस असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. पुढील काही दिवसांबाबतही अंदाज व्यक्त करत गुरुवार आणि शुक्रवारी काही ठिकाणी पाऊस पडेल, तर २५ मेनंतर अवकाळी पावसाची शक्यता आहे.
जून महिन्यात ५, ६ आणि ७ तारखेला चांगला पाऊस होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र एक महत्त्वाचा इशाराही त्यांनी दिला आहे, परतीचा पाऊस यंदा जोरात होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे.





