
अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणासाठी मोठी बातमी समोर आली आहे. अखेर रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच जिल्ह्यात निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
मंडळी, जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपलेल्या आणि नव्याने स्थापन झालेल्या तब्बल ८४३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. अनेक ठिकाणी गेल्या काही काळापासून प्रशासकांकडे कारभार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थ या निवडणुकांची आतुरतेने वाट पाहत होते.
निवडणूक आयोगाने आता मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे. २४ जुलैला प्रारूप मतदार यादी, तर ४ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, २४ ते २९ जुलै या कालावधीत मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक संगमनेर तालुक्यात ९४, पारनेरमध्ये ८८, पाथर्डीत ७९, श्रीगोंद्यात ६२, नगर तालुक्यात ६०, नेवासात ५९, कर्जतमध्ये ५५, अकोल्यात ५२, जामखेडमध्ये ४९, शेवगावमध्ये ४८, राहुरीत ४४, कोपरगावमध्ये २९, श्रीरामपूरमध्ये २७ आणि राहाता तालुक्यात २५ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता गावागावात राजकीय हालचालींना वेग येणार असून, इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत.





