
देशात महागाईने पुन्हा एकदा डोके वर काढले आ आणि यावेळी तर ४२ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. नेमकं काय चाललंय, आणि महागाई एवढी का वाढते आहे, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे.
मंडळी, एप्रिल २०२६ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर थेट ८.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात हा दर केवळ ३.८८ टक्के होता. म्हणजेच एका महिन्यात महागाईत मोठी झेप पाहायला मिळाली आहे.
महागाई एवढी वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे पश्चिम आशियातील युद्धजन्य तणाव. या परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेवर थेट परिणाम होत आहे.
त्यातच होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि कच्चं तेल महाग झालं की त्याचा परिणाम थेट इंधन, वाहतूक आणि सर्वच वस्तूंवर होतो. धातू, रसायने आणि वस्त्रोद्योगातील उत्पादन खर्चही वाढला आहे. ऊर्जा खर्च वाढल्यामुळे उद्योगांवर ताण येतो आणि शेवटी त्याचा भार ग्राहकांवर पडतो. म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं झालं, तर आंतरराष्ट्रीय परिस्थिती, तेलाचे वाढते दर आणि उत्पादन खर्च या सगळ्यांचा मिळून थेट परिणाम आपल्या खिशावर होत आहे.
मंडळी, येत्या काळात महागाई आणखी वाढणार का, की नियंत्रणात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





