Explained

Indurikar Daughter Wedding | दीड कोटींचा खर्च करणारे भक्त कोण? चर्चा काय होताहेत?

इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं गेल्या आठवड्यात लग्न झालं. मुलगी ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाची जशी चर्चा झाली होती, तशीच तिच्या लग्नाचीही राज्यभर चर्चा झाली. संगमनेरमध्ये तब्बल 100 एकरात झालेल्या या शाही लग्नाची चर्चा अजूनही होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळातील बहुतेक मंत्री, सेलिब्रिटी असे सगळेच या लग्नाला उपस्थित होते. लग्नाची एन्ट्री, डेकोरेशन, रुखवत, आतषबाजी, कानपिळा… असे सगळेच इव्हेंट एक-एक करुन सोशल मीडियावर व्हायरल झाले. या लग्न सोहळ्यात तब्बल एक ते दीड कोटींचा खर्च झाल्याच्या चर्चा आहेत. इंदोरीकर महाराजांची लेक, ज्ञानेश्वरीच्या लग्नाचं हे कवित्व अजूनही सुरुच आहे.

या लग्नाबाबत जशा सकारात्मक बातम्या व्हायरल झाल्या, तशाच काही नकारात्मक बातम्याही व्हायरल झाल्या. काहींनी तर लग्नात वऱ्हाडींना पोटभर जेवणही मिळालं नसल्यांच सांगितलं. आता यातलं खरं किती आणि चर्चा किती, हा भाग निराळा… पण एक मात्र खरं की, लग्नात झालेला, हा एक ते दीड कोटींचा खर्च नेमका कुणी केला? हा खर्च आपल्या भक्तांनी केल्याचं महाराजांनी सांगितलं, शिवाय काही भक्तांची नावंही सांगितली. त्यामुळे सहाजिकत आता ते भक्त चर्चेत आलेत. इंदोरीकरांच्या मुलीच्या लग्नाची हीच दुसरी बाजू आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात…

व्हिडीओच्या सुरुवातीलाच आम्ही एक गोष्ट स्पष्ट करतोय. इंदोरीकर महाराजांनी आपल्या मुलीचं जसं लग्न केलं, त्यावर आम्हाला काहीच आक्षेप नाही. उलट आपल्या मुलीचं लग्न म्हटल्यावर, एक बाप म्हणून कोणताही माणूस ते भव्यदिव्य करणारच… इंदोरीकर महाराजांचं दुसरं एक स्पष्टीकरण आम्हाला आवडलं… ते म्हणाले, ज्याच्यात हिंम्मत आहे तो हे करतो. फक्त कर्ज काढून असं काही करु नका… हेही आम्हाला मान्य आहे. त्यामुळे या शाही थाटाबाबत आम्हाला आक्षेप किंवा किंतू असण्याचं काहीच कारण नाही. उलट एक महाराज आपल्या मुलीला सासरी पाठवताना, एवढा भव्यदिव्य सोहळा करतो, हेही वखाणण्याजोगं आहे. परंतु याच सोहळ्यानंतर काही चर्चा समोर आल्या त्याच आपण पाहणार आहोत…

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह गेल्या रविवारी संगमनेर येथे प्रसिद्ध उद्योगपती साहिल चिलप यांच्यासोबत थाटामाटात पार पडला. या शाही विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. लग्नात व्हीव्हीआयपीपासून गावातील सामान्यांपर्यंत हजारो वऱ्हाडी उपस्थित होते. विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडींची संख्या लक्षात घेता जेवणाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आणि पारंपारिक पद्धतीने करण्यात आली होती. या शाही विवाह सोहळ्यासाठी अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांची मेजवानी होती.

मोती पाक बर्फी, मिक्स व्हेज, डाळ भात, पुरी, मटकी, असा साधा मेन्यू ठेवण्यात आला होता. मात्र काहीनी या सोहळ्यातही चुका काढल्याच. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, लग्न अतिशय थाटामाटात पार पडले. मात्र जेवणाचं नियोजन अजिबात चांगले नव्हते. वाढप्यांचे नियोजन नव्हते. कुणाला फक्त डाळ भात भेटला तर कुणाला फक्त मटकी तर काहींना चपाती तर काही ना पुरी मिळाली. जेवणाचे नियोजन पाहता काही लोक उपाशी निघून गेले किंवा कोणी हॉटेलमध्ये जेवण करणे पसंद केलं. व्हीव्हीआयपीच्या गर्दीत सामान्य वऱ्हाड्यांचे जेवणाचे हाल झाल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अर्थात कोणतंही लग्न असलं तरी असं होतंच, हे आपण मान्य करु…

आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, लग्नात झालेला खर्च… काही बातम्यांच्या आधार घेतला, तर लग्नाचा हा खर्च इंदोरीकर महाराजांच्या भक्तांनी केल्याचं सांगितलं गेलं. स्वतः महाराजांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. “देणाऱ्यांनी श्रद्धेने दिले आहे, त्यामुळे ट्रोल करण्याचा कोणालाही अधिकार नाही,” असे महाराजांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. लग्नासाठी आपण कोठेही कर्ज किंवा लोन घेतलेलं नाही, हेही त्यांनी सांगून टाकलं. आपल्या मुलीच्या लग्नाचा 90 टक्के खर्च हा आपल्या भक्तांनी केला, असंही त्यांनी जाहीर केलं.

काही मिडिया रिपोर्टनुसार या लग्नासाठी तब्बल एक ते दीड कोटींपेक्षा जास्त खर्च झाला असावा. आता मुलीच्या लग्नाचा 90 टक्के खर्च कोणत्या भक्तांनी उचलला हेही महाराज नकळत सांगून बसले. लग्नातील 90 टक्के भार हा स्वदेश प्राँपर्टीजचे मालक बाळासाहेब देशमाने व उद्योजक रामहारी कातोरे यांनी उचलल्याचे सांगितले. त्यामुळे सहाजिकच या दोन उद्योजकांची चर्चा सुरु झाली.

आता जे झालं ते झालं, परंतु इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नानंतर मात्र शाही खर्च, खर्च करणारे उद्योजक, नकारात्मक चर्चा आणि ट्रोलिंग मात्र सुरु झालंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button