
“दोन दिवसांपूर्वी घेतलेली नवी स्कुटी… आणि पहिल्याच प्रवासात काळाने घातला घाला! राजूरमधील या भीषण अपघाताने शुक्ला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.”
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील राजूर येथे कोल्हार-घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात झाला. बुधवारी, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास स्कुटी आणि केटीएम दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या दुर्घटनेत काजल संजय शुक्ला, वय २४, आणि अक्षय तुकाराम भोईर, वय २५, यांचा मृत्यू झाला. तर शंकर पोपट खाडे, वय २६, हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी नाशिकला हलवण्यात आले आहे.
काजल दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या नव्या स्कुटीवरून अकोलेकडे जात होती. मात्र, राजूर स्मशानभूमीजवळ समोरून भरधाव आलेल्या केटीएमने तिच्या स्कुटीला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेनंतर राजूर पोलिसांनी वाहने ताब्यात घेतली असून, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





