
चहापासून मिठाईपर्यंत प्रत्येक घराच्या बजेटवर परिणाम करणारी मोठी बातमी… साखरेचे दर पुन्हा वाढले आहेत ! गेल्या महिनाभरात साखरेच्या घाऊक दरात तब्बल ६०० रुपयांची वाढ झाली असून, किरकोळ बाजारात साखर आता प्रति किलो ५० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
गेल्या आठवड्यात ४५ ते ४६ रुपये असलेला दर आता आणखी वाढला आहे. व्यापाऱ्यांच्या मते, देशांतर्गत मागणी वाढणे, निर्यातीत वाढ आणि उपलब्ध साठा कमी असणे ही दरवाढीची प्रमुख कारणे आहेत.
श्रावण महिन्यापासून सुरू होणारे सण, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळीमुळे मिठाई उत्पादक, किराणा दुकानदार आणि ग्राहकांकडून साखरेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पिठीसाखरही आता सुमारे ५२ रुपये किलो, तर खडीसाखरेचे दर ८० ते १०० रुपये किलो इतके झाले आहेत. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता, दिवाळीपर्यंत साखरेचे दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.





