
अहिल्यानगरमधून शिक्षण क्षेत्रासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.. अनेक वर्षांनंतर आता पालकांचा कल पुन्हा मराठी आणि जिल्हा परिषद शाळांकडे वाढताना दिसत आहे.
मंडळी, यंदाच्या शैक्षणिक वर्षात अहिल्यानगर तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिलीच्या वर्गात तब्बल २ हजार ६१० नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये १ हजार २१९ विद्यार्थिनी आणि १ हजार ३९१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पटसंख्या वाढल्याने जिल्हा परिषद शाळांबद्दल पालकांचा विश्वास वाढल्याचे चित्र दिसत आहे.
या बदलामागे शिक्षण विभागाने राबवलेले प्रवेश अभियान महत्त्वाचे मानले जात आहे. तर दुसरीकडे अनेक ग्रामपंचायतींनी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छ परिसर, वर्गखोल्यांची दुरुस्ती आणि आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.
खासगी शाळांमधील वाढती फी, पुस्तके आणि गणवेश खरेदीची सक्ती, तसेच काही ठिकाणी पात्र शिक्षकांची कमतरता या कारणांमुळे पालकांचा कल पुन्हा सरकारी शाळांकडे वळत असल्याचे बोलले जात आहे. एकेकाळी विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद शाळा आता पुन्हा गजबजू लागल्या आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणासाठी हा नक्कीच सकारात्मक बदल मानला जात आहे.





