
शेतकरी बांधवांनो, एक आनंदाची बातमी समोर येत आहे ! शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील ७,३०० एमसीएफटी क्षमतेचे घोड धरण शनिवारी पूर्ण क्षमतेने भरले. धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.
धरणाचे तीन दरवाजे उघडून १६०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या पावसामुळे श्रीगोंदा, कर्जत आणि शिरूर तालुक्यातील तब्बल ४० गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सांगितले की, आता धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने वापरले जाईल.
या परिसरातील शेती आणि स्थानिक साखर कारखान्यांचे भवितव्य याच धरणावर अवलंबून असल्याने, हे पाणी आता पिकांसाठी जीवनदायी ठरणार आहे. ही खरोखरच शेतकऱ्यांसाठी दिवाळीसारखी परिस्थिती आहे.





