
गेल्या अनेक दिवसांपासून दमदार पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासाची बातमी आहे. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण झपाट्याने भरत असून ते आता सुमारे ९० टक्के क्षमतेपर्यंत पोहोचले आहे.
धरणातून प्रवरा नदीपात्रात चार हजाराहून अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याशिवाय मुळा, निळवंडे आणि आढळा धरणांमध्येही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.
दरम्यान, आढळा आणि भोजापूर ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाली आहेत. यामुळे परिसरातील बंधारे, विहिरी आणि भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळणार आहे. मात्र नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.





