
पालकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्या लहान मुलाला कमी ऐकू येत असेल, तर आता लाखो रुपयांची ‘कॉक्लियर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया मोफत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंडळी, केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ अंतर्गत श्रवणदोष असलेल्या बालकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी लाभार्थी मुलांची वयोमर्यादा २ वर्षांवरून वाढवून ५ वर्षे करण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.
या शस्त्रक्रियेसाठी साधारण ७ ते ८ लाख रुपयांचा खर्च येतो. हा खर्च अनेक कुटुंबांना परवडणारा नसतो. त्यामुळे अनेक मुलांना वेळेत उपचार मिळत नव्हते. पण आता पूर्ण मान्यता मिळाल्यानंतर ही शस्त्रक्रिया सरकारी योजनेतून मोफत केली जाणार आहे.
कॉक्लियर इम्प्लांट हे एक विशेष उपकरण आहे. हे कानातील खराब झालेला भाग बायपास करून आवाजाचे इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतर करते आणि ते थेट मेंदूपर्यंत पोहोचवते. त्यामुळे गंभीर श्रवणदोष असलेल्या मुलांना ऐकण्यास मदत होते.
दरम्यान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळा आणि अंगणवाड्यांमधील मुलांची नियमित आणि मोफत आरोग्य तपासणीही केली जाते. तपासणीनंतर प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती डिजिटल हेल्थ कार्डमध्ये नोंदवली जाते, त्यामुळे गरजू मुलांवर वेळेत उपचार करणे शक्य होते.





