
राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असतानाच हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळत आहे. पुढील चार ते पाच दिवसांत पुणे, अहिल्यानगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
मात्र, या पावसाचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला मिळणार नाही. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
यंदा अल निनोच्या प्रभावाची चर्चा आणि सरासरीपेक्षा कमी पावसामुळे राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच शेतकऱ्यांचे लक्ष आता परतीच्या पावसाकडे लागले आहे.
दुसरीकडे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आर्द्रता आणि निरभ्र आकाशामुळे उकाडा वाढत असून ऑक्टोबरच्या सुरुवातीला तापमानात सुमारे दोन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच पुढील काही दिवस कुठे पावसाच्या सरी, तर कुठे उन्हाचे चटके!





