
अहिल्यानगरच्या निंबळक येथील अरिहंत कोल्ड स्टोरेजवर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल ७५ हजार किलो बटरचा साठा जप्त केला. जवळपास ३ कोटी ९६ लाख रुपयांच्या या साठ्यामुळे खळबळ उडाली आहे.
हे बटर पुणे जिल्ह्यातील दौंड येथील मधुरमा कंपनीचे असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या कंपनीचा संबंध शिंदेसेनेच्या एका मंत्र्यांशी असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने या कारवाईला राजकीय चर्चेची किनार मिळाली आहे.
मधुरमा कंपनीने हे बटर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका बड्या कंपनीला विकल्याचेही समोर आले आहे. मात्र, बटरमध्ये प्रत्यक्षात भेसळ आहे की नाही, याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
अन्न प्रशासनाने बटरचे नमुने नाशिकच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. सहायक आयुक्त गौरव जगताप, अन्न निरीक्षक किरण जगदाळे आणि डॉ. प्रदीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. आता प्रयोगशाळेच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





