
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही शेतीसाठी औषधे किंवा जैव उत्प्रेरके खरेदी करत असाल, तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की पाहा.
मंडळी, राज्यात बंदी घालण्यात आलेली अनेक शेतीची औषधे अजूनही अहिल्यानगर जिल्ह्यात सर्रास विकली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे याबाबत अनेक तक्रारी होऊनही कृषी विभागाने सुरुवातीला दखल घेतली नसल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, हे प्रकरण न्यायालयात नेण्याचा इशारा दिल्यानंतर कृषी विभाग खडबडून जागा झाला आहे. आता नामांकित २७ कंपन्यांच्या तब्बल ३५० बंदी असलेल्या औषधांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश काढण्यात आलेत. हा आदेश जिल्ह्यातील खत आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आला आहे.
ज्या कंपन्यांकडे खत नियंत्रण आदेशानुसार परवाना नाही, अशा कंपन्यांची औषधे विक्री करताना किंवा त्यांचा साठा आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही कृषी विभागाने दिलाय. म्हणून शेतकरी बांधवांनो, कोणतेही औषध किंवा जैव उत्प्रेरक खरेदी करण्यापूर्वी ते अधिकृत आणि परवानाधारक कंपनीचे आहे का, याची खात्री करूनच खरेदी करा. चुकीचे किंवा बंदी असलेले औषध तुमच्या पिकाचे आणि तुमच्या आर्थिक नुकसानाचे कारण ठरू शकते.





