
जामखेडच्या ज्वारीचा यंदा राज्यभर डंका वाजत असून उत्पादन घट आणि वाढती मागणी यामुळे ज्वारीचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. सध्या बाजारात ज्वारी ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो दराने विकली जात असून गव्हाचा दर २७ ते ३० रुपये प्रतिकिलो असल्याने ज्वारीची भाकरी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
यंदा ज्वारीचा भाव ५ हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेला असून कडब्यालाही ४ ते ५ हजार रुपये दर मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होत आहे.
आरोग्याबाबत वाढती जागरूकता, बदलती जीवनशैली आणि ज्वारीतील पोषणमूल्यांमुळे पुणे, मुंबईसह देशभरात तिची मागणी वाढली आहे. मात्र यंदा पावसाळा लांबल्यामुळे पेरणी उशिरा झाली आणि ज्वारीखालील क्षेत्र घटले, त्यामुळे उत्पादन कमी झाले.
उलट गव्हाचे उत्पादन वाढल्याने त्याचे दर स्थिर राहिले आहेत. ज्वारीमध्ये फायबर, लोह, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक असल्यामुळे ती आरोग्यासाठी उपयुक्त ठरत असून पूर्वी गरीबांची भाकरी मानली जाणारी ज्वारी आता श्रीमंतांच्या ताटातही मानाने पोहोचली आहे, असे चित्र सध्या दिसत आहे.





