
कलिंगड खाताना तुम्हीही ही चूक करत आहात का? उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं कलिंगड काही पदार्थांसोबत खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं!
कलिंगड हे पाण्याने भरपूर आणि लवकर पचणारे फळ आहे. त्यामुळे काही पदार्थांसोबत त्याचे सेवन केल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, कलिंगडासोबत दूध घेणे टाळावे. दूध पचायला वेळ लागतो, तर कलिंगड पटकन पचते. त्यामुळे गॅस, आम्लपित्त आणि पोटात जडपणा जाणवू शकतो.
दही आणि कलिंगड एकत्र खाणेही योग्य मानले जात नाही. यामुळे पचनाच्या तक्रारी, सर्दी, खोकला किंवा घशातील त्रास वाढू शकतो. तसेच तळलेले आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यास पोट फुगणे, अपचन आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
याशिवाय कलिंगड खाल्ल्यानंतर लगेच थंड पेये किंवा बर्फाचे पाणी पिणेही टाळावे. यामुळे पचनक्रिया मंदावू शकते. उन्हाळ्यात कलिंगड जरूर खा, पण योग्य पद्धतीने. छोट्या चुका टाळल्यास त्याचे आरोग्यदायी फायदे अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात.





