
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. एका महिला नगरसेविकेची सोशल मीडियावर बदनामी करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडळी, एका अज्ञात व्यक्तीने इन्स्टाग्रामवर संबंधित महिला नगरसेविकेचे बदनामीकारक फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याची घटना समोर आली आहे. हे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित नगरसेविकेची नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजात बदनामी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
महिला नगरसेविकेने दिलेल्या तक्रारीनुसार, १६ जुलै रोजी संध्याकाळी त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर इन्स्टाग्राम सुरू केले असता, एका अकाऊंटवर त्यांच्याबाबत बदनामीकारक फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकारामुळे त्यांना मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित इन्स्टाग्राम अकाऊंट धारकाविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल खैरे करत आहेत.





