
जामखेडच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. सभापती राम शिंदे यांच्या दाव्यांवर युवा नेते सचिन घुले यांनी जोरदार पलटवार केला आहे.
जामखेड नगरपरिषद निवडणूक ताकदीने लढवून जिंकल्याचं राम शिंदे सांगतात. मग विधानसभा निवडणुकीत याच कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी जिवाचं रान केलं असताना पराभवाची जबाबदारी कोणाची, असा सवाल घुले यांनी उपस्थित केला. नगरपरिषदेतील विजयामागे सुरेश धस यांच्या राजकीय डावपेचांचाही वाटा असल्याचा दावा त्यांनी केला.
दुसरीकडे, जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज न भरताच माघार घेण्याच्या निर्णयावरही घुलेंनी प्रश्न उपस्थित केले. अंतरात्म्याच्या आवाजाने माघार घेतली की अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या फोनमुळे, हे स्पष्ट करा, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, राम शिंदे यांनी माघार कोणत्याही दबावामुळे नसून निष्पक्षता जपण्यासाठी घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. आता या राजकीय संघर्षात राम शिंदे काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.





