
राहुरी आणि श्रीगोंद्यात भगर खाल्ल्याने काही लोकांना विषबाधा झाल्याची बातमी समोर आली होती. अशातच आता FDA ने अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठी कारवाई केली आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने शहरात विशेष तपासणी मोहीम राबवली. याच मोहिमेदरम्यान दाळमंडईतील एका व्यापाऱ्याकडून तब्बल ५३६ किलो भगर जप्त करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या भगरची किंमत तब्बल १ लाख ९ हजार ५२० रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. पण सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या भगरचा दर्जा निकृष्ट असल्याचा आणि त्यामध्ये भेसळ असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मात्र, ही भगर भेसळयुक्त असल्याचे अद्याप निश्चित झालेले नाही. अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेल्या मालाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
आता प्रयोगशाळेचा अहवाल काय सांगतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे उपवासासाठी भगर खरेदी करताना दर्जा आणि विश्वासार्ह विक्रेत्याची निवड करा.





