
एसटी बसस्थानकावर स्वच्छतागृह वापरताना तृतीयपंथीय प्रवाशांना होणारा त्रास आता कमी होणार आहे. कारण, महाराष्ट्र सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अहिल्यानगरसह राज्यातील विविध एसटी बसस्थानकांवर तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या कामांसाठी तब्बल ९ कोटी ७६ लाख ६३ हजार १९५ रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. परिवहन विभागाने बुधवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सहा प्रदेशांतील ३१ विभागांमध्ये ही स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. यामध्ये अहिल्यानगर विभागासाठी ५० लाख ४० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक स्वच्छतागृहासाठी पाणी, सांडपाणी व्यवस्था आणि वीजजोडणीसह सुमारे २ लाख ४० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
या कामांचा खर्च सामाजिक न्याय विभागाच्या तृतीयपंथीय कल्याणासाठीच्या निधीतून केला जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत तृतीयपंथीय प्रवाशांना अधिक सन्मानजनक आणि सोयीस्कर सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.





